Pune: पुण्यात डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल

आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधेयक कलम 376 (2) (न), 377 आणि 323 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representational Images (File Photo)

एअर होस्टेसवर दारू पाजून बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुण्यातील (Pune) आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून तिला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पीडित महिला आणि आरोपी यांच्यात एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. दरम्यान, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत संबंधित महिलेवर वारंवार बलात्कार केला. मात्र, जेव्हा महिलेने आरोपीकडे लग्नाबद्दल विचारले, तेव्हा आरोपीने तिला मारहाण केली, अशी फिर्याद पिडीत महिलेने पोलिसात दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विधवा असून गृहिणी आहे. तर, आरोपी हा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान, टिंडर अॅपवर या दोघांची ओळख झाली होती. दोघांचे एकमेकांशी बोलणे होण्यापूर्वी आणि भेटीपूर्वी आरोपीने पिडित महिलेला लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली आहे. मात्र, ज्यावेळी महिलेने लग्नाचा विषय काढला, तेव्हा आरोपी संतापला आणि त्याने पीडित महिलेवर हल्ला केला, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. हे देखील वाचा-Pune-Mumbai Highway Accidents: पुण्यात 2 भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 10 जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधेयक कलम 376 (2) (न), 377 आणि 323 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

याआधीही पुण्यात डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात एका एअर होस्टेस असलेल्या तरुणीसोबत अशाच प्रकार घडला होता. टिंडरवर ओळख झालेल्या तरूणाने तिला आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला होता. एवढेच नव्हेतर तिला जबर मारहाण देखील केली होती.