Raigad: रायगडमध्ये गुरे चोरीच्या संशयावरून Mob Lynching; जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

यापैकी सहा जणांना अटक करून सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हल्ला (Photo Credits: IANS| Representational Image)

मुंबईजवळील रायगड (Raigad) जिल्ह्यात गुरे चोरीच्या संशयावरून 20 हून अधिक लोकांच्या जमावाने तीन जणांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू (Mob Lynching) झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. माणगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या म्हसेवाडी गावात 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत माणगाव पोलिसांनी 13 हून अधिक गावकऱ्यांविरुद्ध दंगल आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या जमावाने पीडितांची गाडीही जाळली ज्यामध्ये ते गावात आले होते. तिघेही मारुती रिट्झ कारमधून घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेनंतर अनेक स्थानिकांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी आपापले गाव सोडून पळ काढला.

गावातील पोलीस पाटलांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालात (FIR) त्यांनी सांगितले की, काही चोरट्यांनी त्यांची काही गुरे बेशुद्ध करून चोरून नेल्याचे त्यांना आढळले. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. गावातील बसस्थानकाजवळ गुरे बेशुद्ध पडली होती. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये मध्यस्थी करणारे पोलीस पाटील बसस्थानकावर पोहोचले असता तेथे पडलेली गुरे आपलीच असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला.

दरम्यान, गावकऱ्यांनी रावळजे धरणाजवळ कारमधील तीन जणांना पकडले. त्यांच्या वाहनाजवळ आणखी दोन गुरे बेशुद्धावस्थेत आढळून आली. यानंतर संतप्त जमावाने त्यांची कार जाळली आणि या तिघांनाही मारहाण केली. त्यापैकी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एक व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जेथे उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: बुलढाणा जिल्ह्यात कार आणि बसचा अपघात, एक वकिल ठार, 6 गंभीर जखमी)

माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये आतापर्यंत 13 जणांची नावे खुनासह अन्य गुन्ह्यात दाखल करण्यात आली आहेत. यापैकी सहा जणांना अटक करून सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एका पोलीस सूत्राने दावा केला की, पीडितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी यापूर्वी गुरे चोरली आहेत. आता त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे. गुरे चोरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या पीडितांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.