शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण: 71 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले आमदार अनिल भोसले यांना आज कोर्टात हजर करणार

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अनिल भोसले, सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर 71 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण: 71 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले आमदार अनिल भोसले यांना आज कोर्टात हजर करणार
Anil Bhosale | Photo Credits: Facebook

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी (Shivajirao Bhosale Sahakari Bank) बॅंकेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषदेमधील आमदार अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांसह 4 जणांना मंगळवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अनिल भोसले, सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर 71 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले जाईल. या प्रकरणामध्ये अनिल भोसले यांच्यासोबत 11 जणांच्या विरोधात ठेवीदारांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरबीआय बॅंकेकडून 2018-19 मध्ये करण्यात आलेल्या ऑडिटनुसार, या बॅंकेमध्ये 71 कोटींचा घोटाळा झाल्याची बाबा समोर आली आहे. सध्या या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. बॅंकेच्या 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. CA योगेश लकडे यांनी या घोटाळ्याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अनिल भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये खोट्या नोंदी दाखवल्याची बाब बॅंकेच्या ऑडिट मध्ये समोर आली आहे. Shivajirao Bhosale Co-operative Bank: पीएमसी प्रकरणानंतर महाराष्ट्रात अजून एका बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; हजारो ग्राहक काढू शकणार नाही पैसे

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या एकूण 14 शाखा आहेत. तर या बॅंकेचे 16 हजार खातेदार आहेत. बँकेकडून मागील काही दिवसांमध्ये 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर बँकिंग रेग्युलेशन कलम 1949चे पोट-कलम (1) चे कलम 35A अन्वये ही बंधने घातली होती. त्यानुसार खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं घालण्यात आली होती.  काही महिन्यांपूर्वी सरकारकडून झालेल्या चौकशीत या बँकेने तब्बल 300 कोटींचे अनियमित कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आरबीआयने घातलेल्या निर्बंधांनुसार बँकेच्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2020 09:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).