MNS Corporator Vasant More Vandalises the Car: पुण्यात कोरोना विषाणू बाधित नातेवाईकाला रुग्णवाहिका न मिळाल्याने, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी फोडली महापालिका अधिकाऱ्याची गाडी (Watch Video)

यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केली.

MNS Corporator Vasant More Vandalises the Car (Photo Credit : ANI)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) महापालिकेतील गटनेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सोमवारी पुण्यातील (Pune) कात्रज भागात कोविडच्या (Coronavirus) प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मनसेच्या अर्धा डझन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सध्या सर्वांना पुण्यातील कात्रज पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने ही घटना घडली असल्याचे समोर येत आहे.

याबाबत मनसेचे वसंत मोरे म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांपासून कोविड रुग्णांना ना रुग्णवाहिका मिळत आहे, नाही रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहेत. अधिकारी उपचारांच्या नावाखाली सरकारकडून पैसे घेत आहेत, पण ते रुग्णांना सुविधा देत नाहीत. माझा नातेवाईक, जे कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यांना मृत्यूनंतरही साडेतीन तास रुग्णवाहिका मिळाली नाही. सध्या सरकार केवळ विद्युत सुविधांद्वारे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देत आहेत. पुण्यात रुग्णवाहिका मिळत नसल्यास अधिकाऱ्यांना वाहनांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही.’ याच कारणास्तव ही तोडफोड करण्यात आली.

एएनआय ट्वीट -

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नातेवाईकाचे कोरोनामुळे निधन झाले होते. भारती विद्यापीठ रुग्णालय ते कात्रज स्मशानभूमी हे अंतर अवघे एक ते दीड किलोमीटरचे आहे, मात्र तरी त्यांना वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही. मोरे यांनी स्वतः ॲम्बुलन्ससाठी पाठपुरावा केल्यानंतर काही वेळाने ती उपलब्ध झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावर आता आपण नगरसेवक असूनही ही अवस्था तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल असतील? असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,788 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,57,410 वर)

या प्रकरणी त्यांनी सोमवारी महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांच्याकडे झालेल्या घटनेचा जाब विचारला. त्याचवेळी त्यांनी उपायुक्तांच्या सरकारी ॲम्बेसिडर वाहनाची तोडफोड केली. दरम्यान, या आधी पुण्याचे टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांनाही वेळेवर व्हेंटिलेटर असलेली रूग्णवाहिका न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला होता.