आपण सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आम्ही जर का सत्तेत आलो तर यांना तुरुंगात पाठवू’ असे वक्त्यव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे

प्रकाश आंबेडकर (Photo Credits: PTI)

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा बहुजन वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज निवडणूक आयोगाला धमकी दिली. ‘पुलवामा घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावते. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आम्ही जर का सत्तेत आलो तर यांना तुरुंगात पाठवू’ असे वक्त्यव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

आपल्या भाषणामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्याबाबत निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलू नये असे आदेश दिले आहेत. मात्र संविधानाने आम्हाला आमचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष असल्याप्रमाणे वागत आहे. त्यामुळे आम्ही जर का सत्तेत आलो तर निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. (हेही वाचा: सोलापूर: प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत ‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख; कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल)

पुढे त्यांनी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर टीका केली. आपण सत्तेत आल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेलमध्ये असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, सोलापुरमध्ये सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर, डॉ. जयसिद्धेश्वर महाराज हे भाजप उमेदवार आहेत. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर, सुशिलकुमार शिंदे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महाराज असा सामना रंगणार आहे.