Local Self Government Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर; पुढची सुनावणी 28 नोव्हेंबरला होण्याची शक्यता
त्यामुळे आता पुढची सुनावणी 28 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
Local Self Government Election: महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची (Local Self Government Election) सुप्रीम कोर्टातली (Supreme Court) सुनावणी लांबणीवर पडली आहे. 92 नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना याबाबत आज कोर्टात निर्णय झाला नाही. त्यामुळे आता पुढची सुनावणी 28 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत 4 ते 5 वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही. आज यासंदर्भात सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात 23 ऑगस्ट रोजी राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही यावर शेवटची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील सुनावणी 5 आठवड्यांनी पुढे ढकलली होती. (हेही वाचा - Narayan Rane यांच्याकडून BMC च्या तोडक कारवाईपूर्वी स्वतःच Adhish Bungalow वरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात)
शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं तसेच राज्यातील 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका केली होती. यावर न्यायालयाने 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता.
तथापी, राज्यातल्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना संकटामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.