व्हिडिओ: स्फोटकांनीही टेकले हात; नीरव मोदी याचा बंगला खचला परंतू पडला नाही

तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बंगल्याच्या चाहरी बाजूंनी सुरुंग लावण्यात आले. बंगल्याच्या मुख्य खांबांना (पिलर) मोठी भोके पाडून त्यातही स्फोटके भरण्यात आली होती. इतका सगळा बंदोबस्त केल्यानंतर काही क्षणांतच बंगला जमीनदोस्त होईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला

Nirav Modi Bungalow in Alibag | (Photo Credit: Twitter)

पंजाब नॅशनल बँक घोटाळा (Punjab National Bank scam) प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी ( Nirav Modi) याचा अलिबाग (Alibag) येथील बंगला प्रशासनासाठी एक आव्हानच ठरला आहे. सीआरझेड (CRZ Act) कायद्याचे उल्लंघन करुन बांधन्यात आलेल्या या बंगल्याच्या पाडकामाच्या कारवाईस दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली आहे. मशीनच्या सहाय्याने हा बंगला पाडण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे हा बंगला नियंत्रित स्फोटके वापरुन पाडण्याचा प्रयत्न शुक्रवारी (8 मार्च 2018) करण्यात आला. त्यासाठी 30 किलो स्फोटकं वापरण्यात आली. परंतू, स्फोटकांनीही हार मानली. हा बंगला पडला नाहीच. तो केवळ जागेवरच खचला. त्यामुळे 'ये दीवार टुटती क्यू नही!', असा सवाल प्रशासनाला पडला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बंगला पाडण्यासाठी लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बंगल्याच्या चाहरी बाजूंनी सुरुंग लावण्यात आले. बंगल्याच्या मुख्य खांबांना (पिलर) मोठी भोके पाडून त्यातही स्फोटके भरण्यात आली होती. इतका सगळा बंदोबस्त केल्यानंतर काही क्षणांतच बंगला जमीनदोस्त होईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला. स्फोटकांमुळे बंगल्याला साधा तडाही जाऊ शकला नाही. बंगला जागेवरच खचला पण पडला नाही. बंगल्याचे बांधकाम हे दगडी आणि आरसीसी असल्याने पाडकामात अडथळा येत असल्याचे समजते. (हेही वाचा, अलिबाग येथील नीरव मोदी याच्या बंगल्यात सापडला दुर्मिळ वस्तूंचा खजिना)

दरम्यान, बंगला आता खचला आहे. पुढील 15 ते 20 दिवसात मशिनच्या सहाय्याने तो पूरता पाडण्यात येईल असे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. जे लोक सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर बांधकामांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल. ही करवाई म्हणजे अवैध बांधकामे करणाऱ्या मंडळींसाठी इशाराच असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.