पुणेकरांना दिलासा! थकबाकी मिळाल्याने ठेकेदारांकडून PMPML चा संप मागे

गेल्या चार महिन्यांपासून ऑलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी आणि हंसा या चार ठेकेदार कंपन्यांचे तब्बल 99 कोटी रुपयांचे बिल हे थकल्यामुळे त्यांनी संपाची हाक दिली होती.

PMPML BUS

पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपीएमएल)ला  (PMPML) बससेवा पुरवणाऱ्या चार ठेकेदारांनी गेल्या अनेक महिन्यांपासूनची थकबाकी न मिळाल्याने रविवारी अचानक संपाची (PMPML Strike) हाक दिली होती. यामुळे पुणेकरांचे (Pune) मोठे हाल झाले होते. सामान्य नागरिकांना सणाच्या दिवशी बससेवा बंद असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर सोमवारी रात्री बससेवा पुरवणाऱ्या 4 ठेकेदारांना  66 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्यानंतर बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी या बद्दलची माहिती दिली आहे. (Onion Price: कांद्याच्या घसरलेल्या भावाचा निषेध; नाशिकमध्ये शेतकऱ्याने दीड एकर पिकाची केली होळी)

गेल्या चार महिन्यांपासून ऑलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी आणि हंसा या चार ठेकेदार कंपन्यांचे तब्बल 99 कोटी रुपयांचे बिल हे थकल्यामुळे त्यांनी संपाची हाक दिली होती. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पीएमपीएमपीएल प्रशासनाला 90 कोटी रुपये दिले. यापैकी 66 कोटी रुपये ठेकेदारांना देण्यात आले तर 24 कोटी रुपये हे एमएनजीएलला देण्यात येणार आहे.

दरम्यान या संपाच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि संतोष नांगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची  भेट घेतली होती. या सर्वांनी बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. यांनतर बकोरिया यांनी थकबाकीची रक्कम अदा करत संप मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पीएमपीएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून 900 बसेस या पीएमपीएलच्या मालकीच्या आहेत.