Pension Schemes: पाच निवृत्ती वेतन योजनांतील 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रतिमहिना एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार- Minister Dhananjay Munde
35 लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे, दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी 1 हजार 428 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने, राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील 35 लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे, दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी 1 हजार 428 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या 5 योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा: 'ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे'; आरोग्यमंत्री Rajesh Tope)
याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत जारी करण्यात आला असून, त्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) 330 कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) 60 कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) 45 कोटी, श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण) – 660 कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु. जाती) 120 कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु.जमाती) – 90 कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना – 110 कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना – 12 कोटी रुपये आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना – 1.50 कोटी रुपये, असे एकूण 1 हजार 428 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. पुढील दोन तीन दिवसात तातडीने हा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2021 10:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

