SBI खातेदारांसाठी अलर्ट! 1 ऑक्टोबर पासून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बसणार भूर्दंड

भारतीय स्टेट बँकेने (SBI) 1 ऑक्टोबर 2026 पासून बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी रोख रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केला आहे. मोफत मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार आहे.

SBI खातेदारांसाठी अलर्ट! 1 ऑक्टोबर पासून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बसणार भूर्दंड
SBI | (Photo Credits: PTI)

15 ऑक्टोबरपासून यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होण्याच्या चर्चेदरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ठराविक ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याच्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांनुसार, ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.

SBI च्या कोणत्या खातेदारांना लागू होणार नियम

SBI ने स्पष्ट केले आहे की हा बदल बँकेच्या सर्वच खातेदारांना लागू होणार नाही. हा नियम प्रामुख्याने बँकेच्या शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांशी संबंधित ग्राहकांसाठीच लागू करण्यात आला आहे.

महिन्याला किती वेळा पैसे काढणे राहणार मोफत

भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2026 नंतरही BSBD खातेदारांना दरमहा ठराविक मर्यादेत मोफत पैसे काढण्याची सोय कायम राहणार आहे. महिन्यातून एकूण 4 वेळा एटीएम किंवा बँक शाखेतून पैसे काढणे पूर्णपणे मोफत असेल. मात्र ही मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारावर 15 रुपये शुल्क आकारले जाईल. या 15 रुपयांच्या शुल्कासोबतच ग्राहकाला लागू असणारा जीएसटीही अतिरिक्त भरावा लागणार आहे.

डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम नाही

SBI च्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या बदललेल्या नियमांचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक आधीप्रमाणेच यूपीआय, नेट बँकिंग किंवा इतर डिजिटल पेमेंटद्वारे कितीही वेळा मोफत व्यवहार करू शकतील. त्यावर कोणतीही मर्यादा किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

AePS व्यवहारांच्या नियमांतही बदल

बँकेने आधार सक्षम पेमेंट सिस्टीम म्हणजेच AePS द्वारे होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. आधी AePS द्वारे केलेले कॅश व्यवहार डिजिटल व्यवहार मानले जात होते आणि त्यांना 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत धरले जात नव्हते. मात्र आता बँकेने ही सूट काढून घेतली असून, AePS द्वारे काढलेली रोख रक्कमही आता महिन्यातील 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेतच मोजली जाणार आहे.

एसबीआयची आर्थिक कामगिरी

यापूर्वी एसबीआयने ऑगस्ट महिन्यात 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाचे दर 15 ऑगस्टपासून सुधारित केले होते. याशिवाय चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 10.23 टक्क्यांनी वाढून 21,121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 19,160 कोटी रुपये होता.

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2026 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).