विद्युत तारेला स्पर्श होताच 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली, कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट

कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फूट उंच गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोखले कॉलेज चौकात विद्युत तारेला स्पर्श होऊन अचानक रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मंडळ आणि महावितरणने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

विद्युत तारेला स्पर्श होताच 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली, कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट
Kolhapur Balancing Murti Accident | Instagram @karveercha_raja

बारा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज, 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत एक दुर्दैवी घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची तब्बल 21 फूट उंच गणेशमूर्ती गोखले कॉलेज चौकात अचानक रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त झाली. करवीरचा राजा म्हणून ओळख असलेल्या या मंडळाची मूर्ती यंदा बॅलंसिंग अंदाजामध्ये होती. मात्र विसर्जनाला जाताना अपघात झाला.

विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श अन् झाली दुर्घटना

 शुक्रवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजता गोखले कॉलेज चौकात हा प्रकार झाला आहे. वाय. पी. पोवार नगर येथून मंडळाची भव्य गणेशमूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. मूर्ती एका पायावर उभी आणि काहीशी झुकलेल्या स्थितीत होती. मिरवणूक गोखले कॉलेज चौकात पोहोचल्यानंतर मार्गावरील विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात तिचा तोल गेला. काही क्षणांतच बाप्पाची मूर्ती रस्त्यावर कोसळली, त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि गणेशभक्तांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने कोसळलेली मूर्ती रस्त्यातून बाजूला केली.

मंडळाचा आरोप, यंत्रणांकडून दुर्लक्ष

या घटनेनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. गणेशमूर्ती ज्या मार्गाने नेण्यात येणार होती, त्या मार्गावरील विद्युत तारा तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांबाबत संबंधित यंत्रणांना आधीच विनंती करण्यात आली होती. मात्र आवश्यक पूर्तता न झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा दावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

महावितरणचा दावा फेटाळला आरोप

दुसरीकडे, महावितरणने मंडळाचा आरोप फेटाळून लावला आहे. या घटनेत आपला कोणताही दोष नसून आवश्यक कामे आधीच पूर्ण करण्यात आली होती, असे महावितरणचे म्हणणे आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची पथकेही परिसरात तैनात होती आणि वाय. पी. पोवार नगर येथून गोखले कॉलेजपर्यंत मूर्ती आणताना आवश्यक त्या ठिकाणी पथकाने मदतही केल्याचा दावा महावितरणने केला आहे.

जबाबदारीचा प्रश्न अनुत्तरित

मंडळ आणि महावितरण यांच्याकडून या घटनेबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. मात्र २१ फुटी गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला काही काळ गालबोट लागले आणि गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त झाली.

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2026 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).