Pandharpur Fake Ornaments: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोतेभर खोटे दागिने अर्पण
यावेळी अनेकदा खोट्या नोटा आणि खोट्या सोन्या-चांदीच्या वस्तू सापडतात. या वस्तूंची नोंद करून त्या वेगळ्या ठेवल्या जातात.
Pandharpur Fake Ornaments: राज्यभरातून पंढरपूरच्या विठ्ठलच्या दर्शनासाठी लोक येतात. तसेच अनेकजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विठूरायाकडे नवस मागतात. हा नवस पूर्ण करण्यासाठी भाविक सोने, चांदी किंवा इतर वस्तू मंदिरात अर्पण करतात. मात्र, आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विठ्ठल मंदिरात पोतेभर खोटे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. भाविक आपल्या परिस्थीतीनुसार, देवाला वस्तू अर्पण करतात. अनेक भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे शक्य होत नाही. त्यामुळे ते नवस फेडायला खोटे दागिने (Fake Jewellery) अर्पण करतात.
दरम्यान, प्रत्येक महिन्याला मंदिरातील दानपेटीतील पैसे आणि सोन्या-चांदीच्या वस्तूची तपासणी केली जाते. यावेळी अनेकदा खोट्या नोटा आणि खोट्या सोन्या-चांदीच्या वस्तू सापडतात. या वस्तूंची नोंद करून त्या वेगळ्या ठेवल्या जातात. सध्या मंदिरात खऱ्या दागिन्यांसोबत पोतेभरुन खोटे दागिनेही जमा झाले आहेत. (हेही वाचा - Pandharpur Wari 2022: पंढरपूर वारी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या महाराज पुरुषोत्तम पाटील दादा यांच्याकडून (Watch Video))
विठ्ठल-रुख्मिणी मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विटा बनवण्यात येणार आहेत. सध्या देवाकडे 31 किलो सोने आणि 1050 किलो चांदी जमा झाली आहे. दरवर्षी देवाच्या खजिन्यात 3 किलो सोने आणि 200 किलो चांदीची वाढ होत असते. विठूरायाला श्रद्धेने सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणाऱ्या भाविकांनी स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी सराफाकडून दागिन्यांची पावती घ्यावी, असं आवाहन मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.
तथापी, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका महिलेने पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक कोटी रुपयांचं गुप्तदान केलं होतं. मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी ठरली.