उच्च न्यायालयाने चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली, भीम आर्मीला 2 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात सभा घेण्यास मज्जाव
मात्र कोरेगाव -भीमा येथे चंद्रशेखर आझाद अभिवादन करण्यासाठी जाऊ शकतात.
भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar) यांना मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही सभा घेण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. 2 जानेवारीपर्यंत भीम आर्मीला महाराष्ट्रात सभा घेण्यास बंदी आहे. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र पुणे विद्यापीठाने नकार दिल्यानंतर आता उच्च न्यायालयानेही परवानगी नाकारली आहे. पोलीस याप्रकरणी 4 जानेवारीला न्यायालयात शपथपत्र दाखल करणार आहेत.
कसा होता नियोजित कार्यक्रम ?
आझाद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महराष्ट्रात पाच सभा नियोजित होत्या. पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता होणार होती. त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्यात , 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 2 जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम आहे.
पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर भीम आर्मीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही आझाद यांना सभेसाठी परवनागी नाकरली आहे. मात्र कोरेगाव -भीमा येथे ते अभिवादन करण्यासाठी जाऊ शकतात.