Thane Shocker: बदलापूर येथील 12 वर्षीय विदेशी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती; आरोपी फरार
धक्कादायक म्हणजे पीडितेवर पाठीमागील अनेक दिसांपासून अत्याचार सुरु होते. अल्पवयीन पीडितेला (Nepalese Minor Girl) शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पालकांनी रुग्णालयात जाऊन तिची वैद्यकीय तपासणी केली.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथे 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेवर पाठीमागील अनेक दिसांपासून अत्याचार सुरु होते. अल्पवयीन पीडितेला (Nepalese Minor Girl) शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पालकांनी रुग्णालयात जाऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेचा वैद्यकीय अहवाल पाहून पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने बदलापूर पूर्व पोलीस (Police) ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि पीडिता मुळचे नेपाळचे रहिवासी आहेत.
पीडितेचे कुटुंब मुळचे नेपाळचे
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे येताच मोठी खळबळ उडाली. पोलिसांमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पीडितेचे आई-वडील मुळचे नेपाळचे आहेत. उदरनिर्वाहाचे साधन शोधत पोट भरण्यासाठी ते भारतात आले होते. भारतात काही ठिकाणी भटकंती केल्यावर हे दाम्पत्य ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन हद्दीत स्थिरावले. हे दाम्पत्य निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामावर रोजंदारीने कामाला होते. इमारतीच्या बांधकामस्थळीच एक खोली या दाम्पत्यास राहण्यास देण्यात आली होती. त्यांच्यासोबत असलेली 12 वर्षांची मुलगीही त्यांच्यासोबत राहात होती. दरम्यान, जून 2024 मध्ये ही मुलगी घरात एकटीच असताना अज्ञात व्यक्तीने हे घरात प्रवेश केला. तेथे तिच्यावर अत्याचार करुन तो त्याने तिला धमकीही दिली. त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. (हेही वाचा, Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना)
आरोपीकडून पीडितेस धमकी
दरम्यान, भयभीत झालेल्या पीडितेने घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केली नाही. अखेर काही महिन्यांनी तिला शारीरिक त्रास जाणवू लागल्यानंतर तिने आई-वडीलांना सांगितले आणि वैद्यकीय तपासात घडल्या प्रकाराचा भांडाफोड झाला. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला असावा, असा संशय आहे. पीडितेला पोटाचा गंभीर त्रास होत आहे. तिला उपचारासाठी उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 19 जुलै रोजी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. दरम्यान, पीडितेच्या 29 वर्षी आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीचा शोध सुरु केला आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.