राष्ट्रवादीला मोठा धक्का, सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत याने दिला आमदारकीचा राजीनामा, शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे कट्टर समर्थक व रायगड जिल्हा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या अवधूत तटकरे(Avdhut Tatkare) यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजत आहे.त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या पक्षांतराच्या राजकारणात आता अवधूतही शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे
राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे कट्टर समर्थक व रायगड जिल्हा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या अवधूत तटकरे(Avdhut Tatkare) यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजत आहे.त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या पक्षांतराच्या राजकारणात आता अवधूतही शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अवधूत तटकरे हे अलिबाग-रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने अवधूत निवडून आले होते, त्यामुळे साहजिकच या भागात अवधूत यांना असणारा पाठिंबा पाहिल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे हे निश्चित.
प्राप्त माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी अवधूत यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थनी म्हणजेच मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती, तेव्हापासूनच त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे सुनील व अवधूत तटकरे या काका- पुतण्यामध्ये देखील शीतयुद्ध सुरु होते, मध्यंतरी स्वतः शरद पवार यांनी देखील त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात होते. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर या तारखा जाहीर केल्या जातील अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना - भाजपा मध्ये आयाराम- गयारामांचे प्रमाण वाढत आहे, यामध्ये आता अवधूत यांचे नाव ही जोडण्यात येण्याचे दाट शक्यता आहे. (राष्ट्रवादी आमदार अवधूत तटकरे यांनी मातोश्री वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; शिवसेना प्रवेशाबद्दल राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात)
दरम्यान, मागील काही दिवसात निर्मला गावित, रश्मी बागल, दिलीप सोपल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठे नेते बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.