Nashik: मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन; तब्बल 1800 कोटी रुपये होणार खर्च
तसेच प्रदूषणही कमी होईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते काल महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथे 226 किमीच्या 1800 कोटी रुपये खर्चाच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे आणि हेमंत गोडसे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या महामार्ग प्रकल्पांमुळे, जिल्हयातील वाहतुकीला वेग येईल तसेच, सुरक्षित, इंधन व वेळेची बचत करणारे उत्तम रस्ते उपलब्ध होतील. तसेच प्रदूषणही कमी होईल. त्याशिवाय, शेतकरी आणि कारागिरांनाही, स्थानिक बाजारांपर्यंत आपली उत्पादने घेऊन जाणे सोपे होईल. ग्रामीण भागही मुख्य रस्त्यांशी, पर्यायाने शहरांशी जोडला जाईल. ज्यामुळे उद्योगात वाढ होऊन, रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
याआधी शुक्रवारी गडकरी म्हणाले की, 2024 च्या अखेरीपूर्वी रस्त्यांच्या पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीच्या असतील. FICCI च्या 95 व्या वार्षिक परिषदेला निरीन गडकरी संबोधित करत होते. लॉजिस्टिक खर्चाच्या मुद्द्यालाबाबत त्यांनी सांगितले की, 2024 च्या अखेरीस ते 9 टक्क्यांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, ‘आमची लॉजिस्टिक कॉस्ट ही एक मोठी समस्या आहे. सध्या ती 16 टक्के आहे, पण मी तुम्हाला वचन देतो की 2024 च्या अखेरीस, आम्ही ते एक अंकी 9 टक्क्यांपर्यंत खाली आणू.’ (हेही वाचा: नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेला छगन भुजबळ जबाबदार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला)
40 टक्के जागतिक संसाधने वापरणाऱ्या बांधकाम उद्योगाबाबत बोलताना मंत्री म्हणाले की, आम्ही पर्यायांचा अवलंब करून बांधकामातील स्टीलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते म्हणाले, ‘बांधकाम उद्योग केवळ पर्यावरणीय प्रदूषणात लक्षणीय योगदान देत नाही तर 40 टक्के जागतिक साहित्य आणि संसाधने देखील वापरतो. आम्ही संसाधन खर्च कमी करण्यावर आणि बांधकाम गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला माहित आहे की बांधकामासाठी सिमेंट आणि स्टील हे प्रमुख घटक आहेत, त्यामुळे आम्ही पर्याय शोधून बांधकामात स्टीलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.’