खुशखबर! आता नाशिक मध्ये धावणार विना रुळांची हायब्रीड मेट्रो, लवकरच सुरु होणार काम; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आता राज्यातील पुढची स्मार्ट सिटी नाशिक (Nashik) येथेही हायब्रीड मेट्रो (Hybrid Metro) धावणार असल्याची माहिती विधानसभेच्या अधिवेशनात ही माहिती देण्यात आली होती.

प्रातिनिधिक प्रतिमा Nagpur Metro (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात मुंबई, नागपूर येथे मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणे मेट्रोचे काम जोरदार चालू आहे. आता राज्यातील पुढची स्मार्ट सिटी नाशिक (Nashik) येथेही हायब्रीड मेट्रो (Hybrid Metro) धावणार असल्याची माहिती विधानसभेच्या अधिवेशनात ही माहिती देण्यात आली होती. नाशिकमध्ये जर का हा प्रयोग यशस्वी झाला तर तिथेही मेट्रो सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ही गोष्ट नाशिककरांसाठी खचितच आनंदाची ठरली आहे.

हायब्रीड मेट्रोचे मेट्रोमध्ये रुपांतर करण्याचे काम शक्य आहे. मात्र दोन्हीसाठी असलेल्या खर्चामध्ये तफावत आहे. हायब्रीड मेट्रोसाठी प्रति किमी 50 कोटी, तर मेट्रोसाठी प्रति किमी 275 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे आता विना रुळांची ही मेट्रो लवकरच नाशिकच्या रस्त्यावरून धावणार आहे.

(हेही वाचा: नाशिक शहरामध्येही मॉल्समध्ये मोफत पार्किंग; महापालिकेत प्रस्ताव मंजूर)

सध्या इतर मेट्रोबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई शहरात 1.16 लाख कोटी रुपयांचे मेट्रो काम सुरु आहे. यापैकी तीन मार्गिका 2021 आणि 2022 अशा दोन टप्प्यात सुरु होतील. यापूर्वी एमएमआरडीएचं क्षेत्र 3965 चौरस किमी होते, जे आता 4355 चौरस किमी करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे केवळ मुंबई आणि ठाणे पुरताच मेट्रोचा विस्तार नाही तर, एमएमआरडीए मधील भिवंडी आणि कल्याण या भागालाही मेट्रोचा लाभ होणार आहे.