Nashik Crime: नाशिकमध्ये तरुणाची अज्ञाताकडून भररस्त्यात हत्या, घटनेनंतर आरोपी फरार
तुषारची हत्या कोणी आणि कशासाठी केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहे.
नाशिकमध्ये (Nashik Crime) दुचाकीवरुन जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात हत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या नासर्डी ब्रिज ते बोधलेनगर मार्गावर ही घटना घडली. या घटनेत तुषार देवराम चोरे नावाच्या तरुणाचा अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या बोधलेनगर परिसरात तुषार चोरे आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. तेवढ्यात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. (हेही वाचा - Bhiwandi News: भिंवडीत सहाव्या मजल्यावरून खेळताना तोल गेला,थेट खाली पडला आणि सुदैवाने जीव वाचला)
मृत तुषार हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना काही संशयित दुचाकीवरुन आले आणि त्यांनी नासर्डी ब्रिजपासून पाठलाग करुन त्याला गाठले. त्यानंतर बोधलेनगर परिसरात पोहोचताच त्याच्यावर धारदार सुरी आणि गुप्तीने सपासप वार केले. या हल्ल्यात तुषार जमीनीवर कोसळला. हल्ल्यानंतर दुचाकीवरील संशयित पसार झाले.
हल्लेखारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. तुषारची हत्या कोणी आणि कशासाठी केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहे. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भररस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.