नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; अशोक चव्हाण यांनी घेतली भेट, शहरात तणावाचे वातावरण

गोविंद कोकुलवार हे काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच पदमशाली युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आहेत

गोविंद कोकुलवार (संग्रहित संपादित प्रतिमा)

नांदेड (Nanded) शहर परिसरात गोल्डमॅन (Goldman)अशी ओळख असलेले गोविंद कोकुलवार (Govind Kokulwar) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरातील चौफाळा भागात, त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ही गोळीबाराची घटना घडली. गोविंद कोकुलवार हे काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच पदमशाली युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास गीविंद आपल्या संपर्क कार्यालयाबाहेर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात हल्लेखोराने त्यांना मागून हल्ला करत, त्यांच्यावर गोळी झाडली. अवघ्या काही सेकंदामध्ये ही घटना घडली त्यानंतर हल्लेखोर पसार झाला. काही दिवसांपूर्वी कोकुलवार यांच्य्कडे खंडणीची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे. कोकुलवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लवकरच मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले जाईल. या दरम्यान अशोक चव्हाण यांनीही गोविंद कोकुलवार यांची भेट घेतली आहे. (हेही वाचा: मोहित मोर, Tik Tok स्टारची दिल्ली मध्ये गोळ्या झाडून निर्घुण हत्या)

याआधीही नांदेड परिसरामध्ये दोन व्यापारांवर गोळीबार करण्यात आला आहे. आता गोविंद कोकुलवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीसदेखील सतर्क झाले आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी ठीकठिकाणी नाकाबंदी केली असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.