नागपूर: मुलाच्या एका चुकीमुळे ऑनलाईन फसवणूक; वडीलांच्या अकाऊंटमधून तब्बल 8 लाख 95 हजार रुपये लंपास
परंतु, एक आगळीवेगळी घटना नागपूर मधून समोर येत आहे. पंधरा वर्षीय मुलाच्या एका चुकीमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, एक आगळीवेगळी घटना नागपूर (Nagpur) मधून समोर येत आहे. पंधरा वर्षीय मुलाच्या एका चुकीमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अशोक मनघटे यांचा पंधरा वर्षीय मुलगा वडीलांच्या मोबाईलमधून फोन पे (PhonePe) अॅपची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याच्या प्रयत्न करत होता. या प्रयत्नात एका चुकीमुळे ऑनलाईन फ्रॉडर्सने त्यांना तब्बल 8 लाख 95 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
अशोक मनघटे यांचा मुलगा धीरज याला मोबाईल अॅमार्फत पैशांचे काही व्यवहार करायचे होते. त्यासाठी त्याने 'फोन पे' अॅपचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च केला. मात्र कस्टमर केअरचा नंबर दाखवणाऱ्या एका फेक लिंकला तो बळी पडला. त्यानंतर धीरजने त्या नंबरवर फोन केला असता फ्रॉडर्सने कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवले आणि त्यांनी धीरजकडून महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली. तसंच धीरजला एक अॅप देखील मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यास सांगितले. ते अॅप डाऊनलोड केल्यावर मात्र धीरज पूरता फसला. धीरजच्या मोबाईलचा अॅक्सेस फ्रॉडर्संना मिळाला आणि त्यांनी वडीलांच्या अकाऊंटमधून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले.
या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या धीरजने वडीलांना याची कल्पना दिली. त्यानंतर वडीलांनी लगेचच एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्यानंतरही डोळ्यांदेखत वडीलांच्या अकाऊंटमधून ऑनलाईन व्यवहार सुरु राहिला. फ्रॉडर्सने तब्बल 8 लाख 95 हजार रुपये लंपास केले. (चंद्रपूर येथे विद्यार्थ्याची ऑनलाईन फोन खरेदी केल्याने फसवणूक, 18 वर्षीय मुलाने नैराश्यातून केली आत्महत्या)
अशोक मनघटे हे वीज मंडळाचे कर्मचारी असून घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी नुकतेच गृहकर्ज काढले होते. मात्र कर्जाचे पैसे तर गेलेच त्यामुळे घराचे स्वप्न तर सोडाच पण कर्ज कसे फेडणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. (ऑनलाईन खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी RBI चे Mobile Wallets साठी नवीन नियम लागू)
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि आर्थिक व्यवहार करणारे अॅप मुलांच्या हाती न सोपवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.