खुशखबर! कोल्हापूरकरांवरील संक्रांत संपली; 520 रुपये किलो ने मटण विक्रीवर झाला एकमताने निर्णय
या निर्णयामुळे संबंध कोल्हापूरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून त्यांच्यावर गेले आठ दिवस सुरु असलेली संक्रांत संपली असच म्हणावं लागेल.
कोल्हापूरात (Kolhapur) गेल्या 8 दिवसांपासून सुरु असलेल्या मटण बंदीवर अखेर तोडगा निघाला आहे. मटण विक्रीच्या दरावर एकमताने निर्णय न होत असल्यामुळे कोल्हापूरात ही मटणबंदी ठेवण्यात आली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी झालेल्या मटण विक्रेत कृती समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यात 520 रुपये किलो दराने मटण विकण्यावर एकमत झाले आहे. या निर्णयामुळे संबंध कोल्हापूरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून त्यांच्यावर गेले आठ दिवस सुरु असलेली संक्रांत संपली असच म्हणावं लागेल. या वादावर तोडगा निघाल्याने सर्वसामान्य ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यवसायिक यांचा जीव भांड्यात पडला आहे.
कोल्हापूरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रति किलो 480 रुपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. यावर तोडगा निघणे अवघड होऊन बसले होते. या वादात कोल्हापूरकरांचा थर्टीफर्स्टही कोरडाच गेला. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी फक्त चिकन देणे सुरू केले होते.
हेदेखील वाचा- कोल्हापूर येथे मटणाच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाल्याने बेमुदत काळासाठी विक्री बंद
कोल्हापूर शहरातील दर 600 रुपयापर्यंत पोहचल्याने स्थानिकांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर मटणाच्या दरावरुन दुकानदारांना त्याचे दर कमी करा अन्यथा दुकाने बंद करा अशी नोटीस बजावली होती. एवढेच नाही तर नागरिकांनी वाढलेल्या मटणाच्या किंमतीमुळे आंदोलन केले होते. त्यानंतर आता बेमुदत काळासाठी कोल्हापूर येथे मटण विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती.
तांबडा आणि पांढरा रस्सा हा कोल्हापूरकरांचा जीव की प्राण. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मटण तब्बल 600 रुपये किलोने विकले जात आहे. याबाबत काहीतरी पावले उचलावीत यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विनंती केली होती. त्यानंतर मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशी नोटीस विक्रेत्यांना बजावण्यात आली. याबाबत संतापलेल्या विक्रेत्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.