मुंबईची कन्या सुश्मिता ठरली Miss Teen World; भारताने पहिल्यांदाच जिंकला हा किताब (Video)
भारताच्या, महत्वाचे म्हणजे मुंबईच्या सुष्मिता सिंह (Suushmita Singh) ने अल सल्वाडोर (El Salvador) येथे पार पडलेल्या मिस टीन वर्ल्ड (Miss Teen World) स्पर्धेचा किताब जिंकला आहे.
भारताने जगाला अनेक सौंदर्यवती दिल्या आहेत. आजही ऐश्वर्या, प्रियंका, सुश्मिता यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धी टिकून आहे. यामध्ये आता अजून एका सौंदर्यवतीची भर पडली आहे. भारताच्या, महत्वाचे म्हणजे मुंबईच्या सुष्मिता सिंह (Suushmita Singh) ने अल सल्वाडोर (El Salvador) येथे पार पडलेल्या मिस टीन वर्ल्ड (Miss Teen World) स्पर्धेचा किताब जिंकला आहे. या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय संचालक फ्रांसिस्को कोर्टेज (Francisco Cortez) यांच्याकडून सुष्मिताला विजेती म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या डोमिनिकन रिपब्लिक (Dominican Republic) आणि पानामाची सौंदर्यवती यांना क्रमश: पहिल्या आणि दुसऱ्या रनरअपने सन्मानित करण्यात आले.
मागच्या वर्षी ही स्पर्धा जिंकणाऱ्या डोमेनिकन रिपब्लिकच्या मिस एंगिवेटे टोरिबियोने सुश्मिताच्या डोक्यावर या ताज घातला. या स्पर्धेत स्पर्धकांचा व्यवहार, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, फॅशन, फिटनेस आणि ग्लॅमर अशा विविध कसोट्यांद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया 8 दिवस चालली. या सौंदर्यस्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सुंदरींनी फॅशन परेड, मेयरशी भेट, प्रेक्षणीय स्थळांची भेट, फोटो सत्र, स्पॉन्सर अॅक्टिव्हीटी आणि चॅरिटेबल इव्हेंट्स अशा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला.
मुंबई, कल्याण येथे राहणारी 18 वर्षाची सुश्मिता, मास मीडियाची विद्यार्थिनी आहे. सुंदर असण्यासोबतच चित्रकार, खेळाडू, वक्ता अशी तिची ओळख आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला जगाची कोणत्या प्रकारे सेवा करायला आवडेल? या प्रश्नाचे सुश्मिताने दिलेले उत्तर जजेसना प्रचंड भावले. सुश्मिता म्हणाली, 'मला लहानपणापासून सांगण्यात आले की मी सुंदर नाही, पण मी मेहनत घेतली आणि आज या ठिकाणी पोहचली आहे. पुढे मी त्या सर्व मुलींसाठी प्रेरणा बनवू इच्छिते, ज्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करत आहेत.’ सध्या विविध क्षेत्रांमधून, ठिकाणांवरून सुश्मितावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.