पश्चिम रेल्वे मार्गावर आज संध्याकाळी धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

ही लोकल मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे. या गाडीच्या डब्यांमध्ये चांगली आसने, आपत्कालीन बटण, सामानासाठी जास्त जागा व सीसीटीव्ही असणार आहे.

Mumbais newest train (PC- Western Railway Twitter)

पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी खास महिला स्पेशल लोकल सुरू केली आहे. ही लोकल मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे. या गाडीच्या डब्यांमध्ये चांगली आसने, आपत्कालीन बटण, सामानासाठी जास्त जागा व सीसीटीव्ही असणार आहे. या लोकलला महिला प्रवाशांचा किती आणि कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार अशा अन्य लोकल तयार करण्यात येणार आहेत.

5 नोव्हेंबर हा पश्‍चिम रेल्वेचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या दिवसाचे निमित्त साधून ही लोकल सुरू करण्यात आली आहे. सध्या ही लोकल प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येईल. त्यानंतर ती कायमस्वरुपी होईल. ही लोकल नॉन एसी असणार आहे.

पश्चिम रेल्वे ट्विट  - 

महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या लोकलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. डब्याला निळ्या रंगाऐवजी ब्राऊन रंग देण्यात आलेला आहे. सध्या ही एकच लोकल प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येणार आहे.

वाचा -Mumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिनाभर मेगाब्लॉक; 22 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य काही लोकल अशापद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. महिलांच्या प्रतिसादानंतर या लोकलमध्ये योग्य ते बदल करण्यात येतील. यासाठी आज संध्याकाळी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार पर्यंत ही गाडी चालविण्यात येणार आहे, असं पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं.