Mumbai Trans Harbour Link: मुंबई ते नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक 25 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार
साधारण 21.8 किलोमीटर पेक्षा जास्त विस्तारित आहे, त्यापैकी 16 किमी पाण्यावर आणि 6 किमी जमिनीवर असेल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, दररोज सुमारे 70,000 वाहने या पुलावरून प्रवास करतील.
आर्थिक राजधानी मुंबईमधील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) येत्या 25 डिसेंबर रोजी उघडण्याची शक्यता आहे. या पुलाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. भाजप नेते वरुण सोनी यांच्या मते, मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा मुंबईचा प्रतिष्ठित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 25 डिसेंबर रोजी लोकांसाठी सुरु होणार आहे. मात्र, याबाबत एमएमआरडीएकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. वृत्तानुसार, भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे काम 97 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. हा पूल मुंबईतील शिवडीपासून सुरू होऊन न्हावा शेवाजवळ संपेल.
25 डिसेंबर ही तारीख अटल बिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती आहे. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 मे रोजी एका ओपन-डेक बेस्ट बसमधून या प्रतिष्ठित पुलावरून प्रवास केला होता. ताज्या अहवालानुसार, इथे 130 पैकी 78 सीसीटीव्ही खांब लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, एमएमआरडीएने टोलच्या पायाभूत सुविधांचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण केले आहे.
या पुलाच्या उद्घाटनाबाबत भाजप नेते वरुण सोनी यांनी सोशल मिडिया ‘एक्स’ माहिती दिली. ते म्हणतात. ‘एक काळ असा होता की, रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्याची चर्चा होती आणि वर्षानुवर्षे पूल तयार होत राहिला. या पुलाबाबत घोषणा कधी झाली आणि काम कधी सुरू झाले हेच कळत नाही. आता थेट उद्घाटनाची बातमी समोर येत आहे.’
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. साधारण 21.8 किलोमीटर पेक्षा जास्त विस्तारित आहे, त्यापैकी 16 किमी पाण्यावर आणि 6 किमी जमिनीवर असेल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, दररोज सुमारे 70,000 वाहने या पुलावरून प्रवास करतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन एमएमआरडीएने पुलावर 3 अग्निशमन आणि बचाव वाहने आणि 2 रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल)
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे बांधकाम तीन पॅकेजेसमध्ये विभागले गेले होते. भारतातील पहिली ओपन रोड टोलिंग (ORT) प्रणालीची अंमलबजावणी हे या पुलाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. हा पूल बांधण्याची जबाबदारी दोन कंपन्यांना देण्यात आली आहे. यामध्ये लार्सन अँड टुब्रो आणि टाटा प्रकल्पांचा समावेश आहे. हा पूल बनवण्याचे काम 2018 साली सुरू झाले, जे 4.5 वर्षात पूर्ण करायचे होते. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. आता ते डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल.