'मुंबई लोकल' सेवा आज मध्यरात्रीपासून बंद; Coronavirus च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
मात्र मालगाड्या सुरू राहणार आहेत.
Mumbai Local Services Shutdown: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना व्हायरसच्या विळख्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेला ब्रेक लागणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज मुंबईमध्ये लोकल सेवा 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे कडून गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 10रूपये असणारे प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रूपयांना मिळणार आहे. दरम्यान भारतीय रेल्वे देखील 31मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मुंबईमध्ये कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी मुंबई रेल्वे, मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग करणं शक्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राम कदम, पंकजा मुंडे या राजकीय नेत्यांचा Lockdown चा सल्ला.
मुंबईच्या स्थानिक वाहतूक व्यवस्थेप्रमाणेच आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्येही स्वच्छता करण्याचं काम वाढवण्यात आले होते. एसटी बस, एक्सप्रेस गाड्यांमध्ये डीप क्लिनिंग सुरू करण्यात आले आहे. तसेच विमानतळाप्रमाणे आता मुंबईमध्ये दादर, ठाणे, कल्याण, सीएसएमटी स्थानकांत प्रवाशांची थर्मोमीटर द्वारा चाचणी सुरू करण्यात आली होती. दरम्यान मुंबईमध्ये खाजगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांना ' वर्क फ्रॉम होम' देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 25% कर्मचार्यांच्या उपस्थितीत कार्यालयं सुरू ठेवत कामकाज करावे असे आदेश देण्यात आले आहे. या नियमांना धाब्यावर बसवणार्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाणार आहे असे पालिका प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. सध्या देशात 341 रूग्ण आहेत तर महाराष्ट्रात 74 रूग्ण असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील मृतांंचा आकडा 6 वर पोहचला आहे. तर आज देशभरात 'जनता कर्फ्यू' अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना घरीच बसण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.