मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांचा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा
न्यायमूर्ती सत्यरंजन यांना दुसऱ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. मात्र त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आपल्याला महाराष्ट्र सोडून जायचे नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी (Satyaranjan Dharmadhikari) यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन यांना दुसऱ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. मात्र त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आपल्याला महाराष्ट्र सोडून जायचे नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
न्यायमूर्ती सत्यरंजन यांच्या राजीनाम्यामुळे त्यांचा सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. मॅथ्यू नेदुम्बरा यांनी सांगितले की, न्यायमूर्ती सत्यरंजन यांच्या राजीनाम्याचं वृत्त ऐकून मला धक्का बसला. मी न्या. धर्माधिकारी यांना शुक्रवारी एका याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याची विनंती केली. मात्र, त्यावेळी त्यांनी मी ऑफिस सोडले आहे. आज माझा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे,’ असे सांगितले. हे ऐकून सुरुवातीला मला मस्करी वाटली. मात्र हे वृत्त खरे असल्याचे समजताच मला धक्का बसला, असेही नेदुम्बरा यांनी सांगितले. (हेही वाचा - शिवसेना नेते अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक)
न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांची 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आल होती. आता न्या. धर्माधिकारी यांची इतर राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळणार होती. परंतु, पदोन्नती मिळण्याअगोदरचं त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यरंजन धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्यानंतरचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. मागील 16 वर्षांत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण निकाल व आदेश दिले आहेत.