Mumbai Dabbawalas: मुंबईचे डब्बेवाले 3 ते 8 एप्रिल दरम्यान सुट्टीवर; चाकरमान्यांची होणार गैरसोय
सेवा क्षेत्रांपैकी असणारा हा व्यवसाय अक्षरशः शून्यावर आला होता. त्यावेळी अनेकांनी इतर पर्यायी नोकऱ्या स्वीकारल्या होत्या. साथीच्या रोगापूर्वी शहरात सुमारे 5,000 डब्बेवाले काम करत होते,
मुंबईच्या (Mumbai) लोकलप्रमाणेच मुंबईचे डब्बेवाले (Mumbai Dabbawalas) हेदेखील मुंबईकरांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहेत. दररोज हजारो कर्मचाऱ्यांना हे डब्बेवाले घरातील ताज्या जेवणाचा डब्बा पुरवत असतात. आता 3 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यानच्या लंच ब्रेकमध्ये शहरातील या हजारो कर्मचाऱ्यांना डब्बेवाले जेवणाचा डबा पुरवू शकणार नाहीत. मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. आपल्या गावातील वार्षिक उत्सव साजरा करण्यासाठी या डब्बावाल्यांनी सुट्टी घेतली आहे. मुंबईतील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात डब्बावाल्यांच्या सेवेवर अवलंबून आहे.
मुंबई डब्बावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की, डब्बावाले लवकरच आपापल्या गावी जाण्यासाठी निघतील. यातील बहुतेक डब्बेवाले पुणे आणि जवळपासच्या जिल्ह्यांतील आहेत. या सहा दिवसांच्या दरम्यान अनेक डब्बेवाले खंडोबाचा उत्सव ते साजरा करणार आहेत. डब्बेवाले रविवारी 9 एप्रिल रोजी मुंबईत परततील आणि सोमवार (10 एप्रिल) पासून पुन्हा कामाला सुरुवात करतील. यातील बहुसंख्य डब्बेवाले खेड, अकोला, संगमनेर, जुन्नर, मावळ आणि मुळशी अशा परिसरातील आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेले आहेत.
महाराष्ट्रात 3 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या ‘यात्रा’ साजऱ्या होत आहेत. त्यामुळे मुंबईतील डब्बावाल्यांनी आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा दिवसांच्या सुट्टीमुळे डब्बावालाच्या संघटनेने त्यांच्या ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यांना (ग्राहकांना) विनंती केली आहे की त्यांनी सुट्टीच्या कालावधीचे पैसे डब्बावाल्यांच्या पगारातून कापू नयेत. ग्राहकांना याची आधीच माहिती दिली आहे. या सहा दिवसांच्या सुट्यांमध्ये महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे डब्बेवाले केवळ चार दिवस सुट्टी घेतील. (हेही वाचा: Thane: मुंबईत पाणीपुरवठ्याला बसणार आणखी फटका; ठाण्यात पाइपलाइन खराब)
दरम्यान, साथीच्या लॉकडाऊन दरम्यान, डब्बावाल्यांना सर्वात जास्त नुकसान झाले होते. सेवा क्षेत्रांपैकी असणारा हा व्यवसाय अक्षरशः शून्यावर आला होता. त्यावेळी अनेकांनी इतर पर्यायी नोकऱ्या स्वीकारल्या होत्या. साथीच्या रोगापूर्वी शहरात सुमारे 5,000 डब्बेवाले काम करत होते, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि सुमारे 1,200 डब्बेवाले ड्युटीवर आहेत आणि शहरातील सुमारे 20,000 ग्राहकांना सेवा देत आहेत.