मुंबई शहर जिल्हा (Mumbai City District) निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले 1 लाख 18 हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये (Voter List) आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदार संघात जाऊन, आपले छायाचित्र दि. 8 जुलै, 2021 पूर्वी जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
मा.भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. दोष रहित व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत दि. 01/01/2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या (Residual Voter) मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदार संघाचे कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.electionmumbaicity.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
(हेही वाचा: पुणे झाले महाराष्ट्रातील सर्वात मोठे व देशातील 7 वे मोठे शहर; PMC मध्ये होणार 23 गावांचा समावेश)
विहीत वेळेत आपण छायाचित्र जमा न केल्यास आपण सदर मतदार संघातून स्थलांतरित आहात अथवा आपण सदर मतदार संघात रहात नाही असे गृहीत धरण्यात येऊन आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी आपणास काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधित जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.