मुंबई: वरळी मध्ये बीडीडी चाळ रहिवासी होलिका दहनाला जाळणार 'कोरोनासूर'; Coronavirus चं संकट दूर करण्यासाठी खास प्रार्थना
'कोरोना' हे व्हायरसचे (Coronavirus) नाव असून 'असूर' म्हणजे राक्षस आहे. त्यामुळे आज होलिकादहनाला त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला जाणार आहे.
Holika Dahan 2020: आज संध्याकाळी होलिकोत्सवाच्या निमित्ताने होलिका दहनाचा कार्यक्रम रंगणार आहे. दरम्यान सार्या विनाशी गोष्टींचा नाश व्हावा या अपेक्षेने होळी पेटवली जाते. मग सध्या जगभर धुमाकूळ घालणारा जीवघेणा कोरोना व्हायरस जगातून निघून जावा यासाठी मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळीत 'कोरोनासूर' जाळला जाणार आहे. 'कोरोना' हे व्हायरसचे (Coronavirus) नाव असून 'असूर' म्हणजे राक्षस आहे. त्यामुळे आज होलिकादहनाला त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला जाणार आहे. Holika Dahan 2020 Muhurat: जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त, पूजा विधि ते यंदा होळीचा सण खास करणारा 499 वर्षांनंतर जुळून आलेला दुर्लभ योग!
जगभरात 3800 पेक्षा अधिक लोकांचा बळी घेणारा 'कोरोना व्हायरस' जगातून नष्ट व्हावा या प्रार्थनेसह आज बीडीडी चाळेतील रहिवासी 'कोरोनासूर' जाळणार आहेत. दरम्यान जगात 1 लाखापेक्षा अधिक कोरोना बाधित आहेत. तर भारतामध्ये त्यापैकी 43 जण आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या विषाणूची दहशत आता जगातील 97 देशांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर नियंत्रण मिळावे यासाठी वैद्यकीय क्षेत्रदेखील काम करत आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन).
ANI Tweet
2018 साली बीडीडी चाळ रहिवाशांनी पीएनबी बॅंकेच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेला व्यापारी नीरव मोदी याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. यंदा होळी सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने आता त्याचा नाश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात अद्याप कोरोना विषाणू संशयित रूग्ण नसल्याचं राज्य आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर या व्हायरसमुळे नागरिकांनी होळी सांभाळून खेळण्याचं आवाहन केलं आहे. मराठी कलाकारांनीदेखील यंदा होळीच्या सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.