Mumbai: गेल्या 20 दिवसांत मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्सने शोधली अनधिकृत प्रवासाची 2,979 प्रकरणे; वसूल केला 10.04 लाख दंड
आता या टास्क फोर्सने 15 जूनपर्यंत अनधिकृत प्रवासाची 2,979 प्रकरणे शोधून काढली आहेत आणि 10.04 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबईमध्ये लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही शहराची जीवनवाहिनी आहे. दिवसाला लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. मात्र यातील अनेक लोक विना तिकीट असतात. अगदी एसी ट्रेन तसेच प्रथम श्रेणी डब्यामधूनही विना तिकीट प्रवास घडत असल्याची अनेक तक्रारी समोर येत आहे. अशा विनातिकीट प्रवासावर चाप बसावी म्हणून 25 मे रोजी वातानुकूलित/प्रथम श्रेणी टास्क फोर्सची (Air-Conditioned / First Class Task Force) स्थापना करण्यात आली. आता या टास्क फोर्सने 15 जूनपर्यंत अनधिकृत प्रवासाची 2,979 प्रकरणे शोधून काढली आहेत आणि 10.04 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांच्या, विशेषत: एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांच्या अनेक तक्रारींनंतर, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एसी सेवा तसेच प्रथम श्रेणीच्या डब्यांमधील अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी एक दल तयार केले आहे.
या टास्क फोर्समध्ये 14 कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाचा समावेश आहे. प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 देखील सुरू करण्यात आला आहे. हेल्पलाइन प्रवाशांना अनियमित प्रवासाच्या घटनांची तक्रार करण्यास परवानगी देते. तसेच पीक अवर्समध्ये तत्काळ मदत आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार फॉलोअप सुनिश्चित करते. अशा उपाययोजनांमुळे 15 जून रोजी अवघ्या 7 तक्रारी आल्या, ज्याचे प्रमाण आधी दररोज 100 हून अधिक तक्रारी असे होते. (हेही वाचा: Pune Accident: तलाठ्याची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; मुंबई-बेंगळुरू महामार्गावर घडली दुर्दैवी घटना)
प्रवाशांना तक्रार क्रमांकाचा वापर करण्यास आणि अनधिकृत प्रवासाच्या कोणत्याही घटनांची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. दरम्यान, मुंबई उपनगरीय नेटवर्क आपल्या 1,810 सेवांद्वारे दररोज सुमारे 33 लाख प्रवाशांची वाहतूक करते. यामध्ये 66 एसी लोकलचाही समावेश आहे, ज्यात दररोज 78,000 प्रवासी प्रवास करतात.