MPSC Exam New Rule: स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा निश्चित; जाणून घ्या कोणत्या वर्गासाठी किती Attemp
आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहणार आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) होणाऱ्या परीक्षांबाबत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. एमपीएससीकडून विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात निवडप्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी सुधारणात्मक उपाययोजनाही केल्या जातात. आता यामध्ये केलेली एक उपाययोजना म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/संधीची संख्या मर्यादित करणे, याबाबत आयोगाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहणार आहेत.
महत्वाचे म्हणजे अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. यासह उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील.
- उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.
- एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाईल.
- उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.
परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी याबाबत नोटिफिकेशन जारी करून माहिती दिली आहे. (हेही वाचा: माझगाव डॉक येथे ट्रेड अॅप्रेंटिस पदांसाठी नोकरभरती; 8 वी, 10 वी पास विद्यार्थी करू शकतात अर्ज, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, पदांची नावे व पगार)
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संकेतस्थळामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अधिक टूल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संकेतस्थळामध्ये तब्बल दहा वर्षांनी बदल करण्यात येत असून आता यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे.