MPSC Exam: एमपीएससी पूर्व परीक्षा प्रकरण हाताळण्यात कोण कमी पडलं? अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं

एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही. काही लोक यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार परीक्षेबाबत काही वेगळी भूमिका घेत आहे असे भासविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

पूर्व नियोजीत असलेली राज्य लोकसेवा आगोयाची पूर्व परीक्षा (MPSC Exam ) पुढे ढकलत असल्याचे एमपीएससी (MPSC ) ने जाहीर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप उसळला. आता त्यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार (Ajit Pawar) यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या वेळी अजीत पवार (Ajit Pawar On MPSC Exam Issue) यांनी स्पष्टपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. एमपीएससी परीक्षा प्रकरण हाताळण्यात नेमकं कोण कमी पडलं याचेही उत्तर देऊन टाकले

अजित पवार म्हणाले की, पूर्व परीक्षा प्रकरण हाताळण्याबाबत एमपीएससी कमी पडलं ही वस्तुस्थिती आहे. हे माझं व्यक्तिगत मत आहे, असेही ते या वेळी म्हणाले. एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही. काही लोक यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार परीक्षेबाबत काही वेगळी भूमिका घेत आहे असे भासविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आज (12 मार्च) एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच केंद्राच्या पथकातील सदस्य आणि काही आमदार खासदार यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही हजर होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एमपीएससी मुद्द्यासोबतच पुण्यातील कोरोना स्थितीवर भाष्य केले. कोरोना हे संकट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी या संकटाला वेळीच गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. शासन, प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या बंधनांचे योग्य पद्धतीने पालण करणे आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. पुण्यात लॉकडाऊन लागू नाही केला जाणार मात्र निर्बंध अधिक कडक केले जातील, असे त्यांनी या वेळी सांगितले. (हेदेखील वाचा- MPSC New Exam Date: एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर)

'मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालो नाही'

प्रसारमाध्यमांतील एका प्रतिनिधीने 'जर सर्व काही पूर्वनियोजित होतं तर मग विद्यार्थ्यांवर अशी वेळ आलीच का' असा सवाल विचारला. यावर अजून मी एमपीएससीचा अध्यक्ष झालो नाही. झालो की या प्रश्नाचं उत्तर देईन, असे अजित पवार म्हणाले.