खा. उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'भाजप'प्रवेश चर्चेला उधाण; राष्ट्रवादीला खिंडार पडायला सुरुवात

नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.

उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित-संपादित प्रतिमा)

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) घवघवीत यश मिळवले. हे पाहून अनेक पक्षांमधील मात्तबर आसामींनी वाऱ्याप्रमाणे दिशा बदलत भाजपचा हात पकडला. महाराष्ट्रामध्ये गेले अनेक महिने हे तोडफोडीचे राजकारण सुरु आहे. आता भाजपमध्ये सामील होणाऱ्या पुढच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वात जवळचे समजले जाणारे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि रामराजे निंबाळकर यांचा समवेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.

या भेटीबाबत सारवा सारव करताना आपण राज्यातील पूरस्थितीत बाबत ही भेट घेतल्याचे उदयनराजेंनी सांगितले. कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी. याचप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे उदयनराजे यांची भेट झाल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. (हेही वाचा: काँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावीत यांचा भाजप प्रवेश)

उदयनराजेंसोबत विधान परिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उदयनराजे यांनी मंगळवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पस्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये उदयनराजे यांचे स्वागतच असेल असे उद्गार काढले आहेत. मात्र दुसरीकडे शरद पवार यांची ही नवी खेळी असल्याचेही बोलले जात आहे.