मंत्री Nawab Malik यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाने सुनावली 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी
ही जमीन हसिना पारकरच्या ताब्यात होती, जी तिने मरियम नावाच्या महिलेकडून घेतली होती. ही जमीन नवाब मलिक यांनी अनेक वर्षांपूर्वी विकत घेतली होती.
1992 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगार सरदार शाह वली खान व सरदार पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप ठेऊन, नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली होती. 8 तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीने न्यायालयाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र अडीच तासाच्या युक्तिवादानंतर मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 तासांच्या विचार विनिमयानंतर मंत्री मलिक यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी सुनावणी आली आहे. नवाब मलिक यांना त्यांच्या कोठडीदरम्यान औषधे व घरचे जेवण मिळण्याबाबतच्या अर्जांवर न्यायालय उद्या सुनावणी पार पडणार आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, कुर्ला येथील 3 एकर जमिनीप्रकरणी मलिक यांना ही अटक करण्यात आली आहे. ही जमीन हसिना पारकरच्या ताब्यात होती, जी तिने मरियम नावाच्या महिलेकडून घेतली होती. ही जमीन नवाब मलिक यांनी अनेक वर्षांपूर्वी विकत घेतली होती. ही जमीन विकत घेऊन ते पैसे दाऊदला पाठवले गेल्याचा भाजपचा आरोप आहे. आता या 8 दिवसांमध्ये मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये मलिक यांच्या कथित सहभागाची एजन्सी चौकशी करेल.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी दावा केला की, अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांची चौकशी करणे, म्हणजे ‘सत्तेचा गैरवापर’ आणि ‘आवाज दडपण्याची खेळी’ आहे. यावर भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे की, घडल्या गोष्टीला ‘सूडाचे राजकारण’ म्हणण्याऐवजी ईडीला तपास पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. नवाब मलिक यांना कोठडी सुनावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (हेही वाचा: 'नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, परवा राज्यभरात महाविकास आघाडीचे आंदोलन'; बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांची माहिती)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आणि सेवेशी संबंधित आरोप केल्यामुळे मलिक गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मलिक यांचा जावई समीर खान याला एनसीबीने गेल्या वर्षी अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती, त्यानंतर मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मुद्दाम आरोप करायला सुरुवात केली अशी टीका भाजपने केली होती.