IPL Auction 2025 Live

पुढे पुढे पाहा काय होतंय... औरंगाबादच्या नामांतरबाबत मंत्री आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; जाणून घ्या काय म्हणाले

आम्ही औरंगाबाद शहराचे स्वरूप बदलण्याचा विचार करीत असल्याचे विचार त्यांनी बोलून दाखवले.

Aaditya Thackeray (Photo Credits: IANS/File)

महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलून ते ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) करण्याबाबतचा वाद सुरु आहे. शहराचे नाव संभाजीनगर ठेवावे या शिवसेनच्या निर्णयाला कॉंग्रेसचा विरोध आहे. दरम्यान, आज पहिल्यांदा मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘औरंगाबादचा विकास हा एक महत्वाचा पैलू असून, त्याचे नाव बदलण्याचा निर्णय हा सत्ताधारी ‘महाविकासआघाडी’मध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये एकमताने घेतला जाईल. पुढे पुढे पाहा काय होतंय.’ आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणार का? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या नामांतराचा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला होता, त्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसमधील वाद वाढला. मात्र आदित्य ठाकरे यांच्या आजच्या सूचक विधानामुळे शिवसेना नामांतराबाबत अतिशय आक्रमक असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने तयार केलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प, कमांड कंट्रोल रूम आणि सायकल मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी आदित्य ठाकरे शहरात आले होते. आम्ही औरंगाबाद शहराचे स्वरूप बदलण्याचा विचार करीत असल्याचे विचार त्यांनी बोलून दाखवले. भाजपची युवा संघटना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) सदस्यांनी शहरात काही ठिकाणी लावलेल्या 'नमस्ते संभाजीनगर' साइनबोर्ड संदर्भात मंत्री म्हणाले की, शिवसेनेचे माजी सहयोगी पाच वर्ष राज्यात असताना त्यांनी शहराचे नाव बदलण्यासाठी काहीच केले. (हेही वाचा: Aurangabad Name Change: औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य)

दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी शिवसेनच्या या निर्णयाला आपला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले होते की, 'आमची पार्टी जागांची नावे बदलण्यावर विश्वास ठेवत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा हा कधीच भाग नव्हता.’ मात्र, सीएम ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले आहे.