MIDC Recruitment: पुण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ- एमआयडीसी- परीक्षा गैरप्रकाराची जोरदार चर्चा, पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता
या प्रकरणी पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) यांच्याकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. एमपीएससी समन्वय समिती ही तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
टीईटी (TET), आरोग्य विभाग पेपरफुटी, म्हाडा भरती परीक्षा (Mhada Paper Scam) गोपनियता भंग आणि गौरव्यवहार यांवरुर सायबर पोलीस जोरदार चौकशी करत आहे. या संदर्भात सहा जणांना अटक झाली आहे. यात तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांचाही समावेश आहे. तुकारम सुपे हे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सुद्धा आहे. प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरुच आहे. या गौरव्यवहारांची चौकशी सुरु असतानाच पुण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसी (MIDC) भरती गौरव्यवहार प्रकरणाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) यांच्याकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. एमपीएससी समन्वय समिती ही तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. दरम्यान, एमपीएससी समन्वय समितीकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे म्हाडा परीक्षा अतिशय काळजीपूर्वक घेतली जाईल. त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही. याची ग्वाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. आव्हाड यांनी सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओही शेअर केला होता. दरम्यान, म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फुटणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना अटक केली. प्रशासनाने तातडीने म्हाडाची परीक्षा रद्द केली. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत टीईटी परीक्षा गैरव्यवहाराचीही लिंक लागली. त्यावरुन पुणे पोलिसानी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह दोघांना अटक केली आहे. (हेही वाचा, Exam Paper Leak Case In Maharashtra: पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती नुकतीच पार पडली. या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आक्षेप घेतला जातो आहे. प्रामुखऱ्याने एमपीएससी समन्वय समितीने या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑपटेककडून घेण्यात आलेल्या एमआयडीसीच्या परीक्षेत काही परीक्षार्थींना 99-196 गुण प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे याच परीक्षार्थींना याआधी घेण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मात्र 14 ते 33 गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षार्थींच्या गुणांमध्ये इतकी तफावत कशी? असा सवालही उपस्थित केला जातो आहे.
मुंबई महापालिका परीक्षा टीसीएस द्वारे तर पुणे एमआयडीसी परीक्षा ॲपटेक द्वारे घेण्यात आली होती. मुंबई महापालिका आणि पुणे एमआयडीसी अशा दोन्ही वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षा वेगवेगळ्या ऑपरेटर्सकडून घेण्यात आल्या होत्या. दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या असल्या तरी परीक्षांचा पॅटर्न सर्वसाधारणपणे सारखाच राहतो. तसेच, जे विद्यार्थी एका परीक्षेत सर्वसाधारण गुणही मिळवू शकत नाहीत तेच विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेत अव्वल गुण कसे मिळवू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे आता टीसीएस, आरोग्य विभाग, म्हाडा याप्रमाणेच पुणे एमआयडीसी भरती परीक्षा प्रक्रियाही वादात सापडणार का? अशी चर्चा सुरु आहे.