Mass Suicide in Pune? पुणे हादरले, भीमा नदीपात्रात सापडले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह; पोलिसांचा सामूहिक आत्महत्येचा संशय
यामध्ये शरीरावर बाह्य जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. अजूनतरी एकही फाऊल प्ले दिसला नाही. शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व मृतदेह भीमा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हे सर्व बुडून मृत्यू झाल्याचे दिसत असून पोलीस याचा तपास करत आहेत. ही घटना पुणे ग्रामीणमधील दौंड तालुक्यातील पारनेर गावची आहे.
सर्वात आधी 18 जानेवारीला या नदीतून एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 19 जानेवारीला नदीत अजून एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20 जानेवारीला पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलीस या सगळ्याचा तपास करत असतानाच, 21 तारखेला पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. म्हणजेच 18 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये एकूण चार मृतदेह सापडले.
यानंतर पोलिसांनी नदीच्या विविध भागात शोधमोहीम सुरू केली असता आज आणखी 3 मृतदेह सापडले. हे तिन्ही मृतदेह लहान मुलांचे होते. मृतांमध्ये मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, जावई श्यामराव पंडित फुलवरे, पत्नी राणी श्यामराव फुलवरे, श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे, छोटू श्यामराव फुलवरे आणि कृष्णा यांचा समावेश आहे. (हेही वाचा: दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात 5 दिवसांमध्ये आढळले 4 मृतदेह; पुणे जिल्ह्यात खळबळ)
लहान मुले वगळता 4 जणांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. यामध्ये शरीरावर बाह्य जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. अजूनतरी एकही फाऊल प्ले दिसला नाही. शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मोहन आणि संगीता हे बीड जिल्ह्यातील आहेत. तर मुलगी आणि जावई उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. हे सर्व लोक नोकरी-व्यवसायासाठी पुणे ग्रामीणमध्ये आले होते आणि इथेच उदरनिर्वाह करत होते. (हेही वाचा: अंधश्रध्देचा कळस! गर्भधारणा व्हावी म्हणून सुनेला खावू घातले मानवी हाडांचे पावडर)
अहवालानुसार, मोहन पवार यांचा मुलगा अनिल याने वडार समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते. या घटनेनंतर बदनामीच्या भीतीमुळे तसेच कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून संपूर्ण कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सर्व दृष्टिकोनातून याचा तपास करत आहेत.