Marathi Classical Language Status: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच PM नरेंद्र मोदी, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Marathi language | (File Image)

मराठी (Marathi Classical Language) आणि त्यासोबतच बंगाली (Bengali), पाली (Pali), प्राकृत आणि आसामी (Assamese) भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रच नव्हे तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या समस्त मंडळींना आनंद झाला आहे. हा आनंद या मंडळींनी वेगवेगळ्या शब्द आणि माध्यमांतूनही व्यक्त केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकारण्यांचा समावश आहे.

मराठी ही भारताची शान आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मराठी भाषेला भिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान आपल्या राष्ट्राच्या इतिहासात मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाची आठवण करुन देतो. मराठी हा नेहमीच भारतीय वारशाचा आधार राहिला आहे. मराठी ही भारताची शान आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आणखी बरेच लोक ती शिकण्यास प्रवृत्त होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Marathi Classical Language: मराठी भाषा अभिजात म्हणून मान्य; बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांनाही तोच दर्जा)

मराठी भारतीय वारशाचा आधार

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजातचेच्या दर्जाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरुन आनंद व्यक्त केला आहे. तसेच, शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे:

माझा मराठाचि बोलु कौतुके।

परि अमृतातें ही पैजा जिंके ॥

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!

एका लढ्याला यश

अत्यंत अभिमानाचा क्षण: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आजचा दिवस हा ऐतिहासिक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेस मिळालेल्या अभिजात दर्जाबाबत कौतुक व्यक्त केले आहे. त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खालील प्रमाणे:

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस.

अत्यंत अभिमानाचा क्षण !

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी...

दरम्यान, आतापर्यंत केवळ सहा भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला होता. ज्यामध्ये तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या भाषांचा समावेश होता. मात्र, आता मरठी, बंगाली, पाली, प्राकृत, असामी भाषांनाही तो मान मिळाल्याने अभिजात भाषांची एकूण संख्या 11 झाली आहे. जी पूर्वीच्या सहापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.