Marathe Jewellers च्या कौस्तुभ मराठेंना पुण्यात अटक; फसवणूकीचा आरोप

सध्या तो कारागृहामध्ये आहे.

Pune Police | (Photo Credits: ANI)

पुण्यातील प्रसिद्ध 'मराठे ज्वेलर्स' (Marathe Jewellers) च्या कौस्तुभ मराठे (Kaustubh Marathe) यांना पोलिसांना अटक केली आहे. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांच्यावर ठेवीदारांना रोख रक्कम, सोनं,चांदी वर चांगला परतावा मिळेल अशा आमिषांनी फसवण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान कौस्तुभ मराठे यांना 18 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मराठे ज्वेलर्स कडून 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांना फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. पुण्यातील पौड रोड शाखा आणि लक्ष्मी रोड शाखेमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे आहे.

मराठे ज्वेलर्सच्या या फसवणूकीच्या प्रकरणामध्ये प्रणव मराठे याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सध्या तो कारागृहामध्ये आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, त्यांची पत्नी नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुभांगी कुटे यांनी ही पोलिस तक्रार केलेली आहे. (नक्की वाचा: Pranav Marathe Arrested: पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे प्रणव मराठेंना अटक, 5 कोटींच्या फसवणूकीचा आरोप).

मंजिरी मराठे यांच्या बँक खात्यामध्ये साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठवण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार होत्या. आरोपींनी गुंतवणुकीपोटी साक्षीदार आणि इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या. कोर्टात सरकारी वकिलांनी आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते देशाबाहेर जाऊ शकतात, साक्षीदारांना धमकवू शकतात. आरोपींच्या स्वाक्षर्‍यांचे नमूने घ्यायचे आहेत. पुरावे गोळा करायचे आहेत असे सांगितल्यानंतर पोलिस कोठडी ठोठावण्यात आले आहेत.