Maratha Reservation: निरोप येताच देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला; अमित शाह यांच्यासोबत मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा होणार?

दरम्यान, फडणीस आणि बावनकुळे हे देखील लगोलग दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, and Chandrashekhar Bawankule together | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाची धग राजधानी दिल्ली अर्थातच केंद्र सरकारला जाणवू लागली आहे का? अशी चर्चा आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेले उपोषण आणि आरक्षण राज्य सरकराने विविध पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आले नाही. चर्चेच्या विविध फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर आता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना निरोप धाडल्याचे समजते. दरम्यान, फडणीस आणि बावनकुळे हे देखील लगोलग दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

तिन नेत्यांची एकत्र बैठक

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात दिल्ली येथे आज दुपारी 3.00 वाजता एक संयुक्त बैठक पार पडणार असल्याचे समजते. ही बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मटा ऑनलाईनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन राज्यातील मराठा आंदोलन आणि विविध घटनांची माहिती आगोदच घेतली होती. त्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने आंदोलन शमविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रयत्न केले. मात्र, कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी आता दिल्ली नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाला दिल्लीला बोलावले आहे.

एकाच वेळी केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील उपमुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष यांची एकत्र भेट होत असल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार का? ही चर्चा निर्णयाप्रत येऊन तोडगा निघणार का, याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकालला जोरदार लक्ष्य केले आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठा आरक्षण हे केवळ केंदर सरकारच्या हातात आहे. राज्य सरकारचा त्यामध्ये फारच थोडी भूमिका आहे. राज्यात आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात भाषण ठोकतात. पण आरक्षणावर चकार एक शब्द काढत नाहीत. राज्य पेटले असताना अजूनही ते विविध राज्यांतील निवडणूक प्रचारामध्ये व्यग्र आहेत. इतक्या दिवसांमध्ये पंतप्रधान मोदी यांना जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलायलाही वेळ मिळाला नाही काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.



संबंधित बातम्या