Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांच्याकडून ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांची दहशतवादविरोधी संघटनेकडून चौकशी करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) संशयात अडकलेले मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी आता ठाणे न्यायालयात (Thane Court) अटकपूर्व जामिन अर्ज (Anticipatory Bail Application) दाखल केला आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांची दहशतवादविरोधी संघटनेकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, 19 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (Who is Sachin Vaze? अंबानी स्फोटक प्रकरणात चर्चेत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे नेमके कोण? वाचा सविस्तर)
उद्योपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी हिरेन यांचे कुटुंबिय आणि विरोधकांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच सचिन वाझे यांच्या निलंबनाची, अटकेची मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ATS करत आहे. ATS कडून वाझे यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी अटक होण्याच्या भीतीपोटी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.
ANI Tweet:
विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सचिन वाझे यांची क्राईम ब्रॉंचमधून नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. तर हिरेन मृत्यूप्रकरण ATS कडे सोपवण्यात आलं आहे.