Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘
राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलैचे प्रतिमाह पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून, या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासनही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात 25 लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर या पुढील राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा: MHADA Mumbai Lottery 2024 Winners List: म्हाडाकडून 2,030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; वेबसाईटवर प्रसिद्ध झाली विजेत्यांची यादी, https://www.mhada.gov.in/en वर पहा)
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.