'महाविकास आघाडीचे 25 आमदार BJP च्या संपर्कात'; मंत्री रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पक्षाला मते मिळाली, पण नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला

रावसाहेब दानवे (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे किमान 25 असंतुष्ट आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या या दाव्यामुळे राज वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना येथे पत्रकारांना सांगितले की, ‘कमीतकमी 25 एमव्हीए आमदार आमच्या संपर्कात आहेत कारण ते नाराज आहेत.’ मात्र त्यांनी आमदारांची नावे सांगण्यास नकार दिला.

शिवसेनेच्या दाव्याच्या विरोधात, ते असेही म्हणाले की 2019 मध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली नव्हती. ते म्हणाले की, 2019 मध्ये ठाकरे कुटुंबीयांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी भाजप नेते अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेवेळी आपणही उपस्थित होतो. त्यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

हल्लाबोल करताना ते असेही म्हणाले की, आजची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची सेना नाही, ती उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सेना आहे. महाविकासआघाडी ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती आहे, जी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाल्यावर तयार झाली होती. (हेही वाचा: करूणा शर्मा कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात; 2024 ला धनंजय मुंडेंनाही आव्हान देणार असल्याची घोषणा)

केंद्रीय मंत्री दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत शिवसेना हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून दूर गेली असल्याचा त्यांनी आरोप केला. 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पक्षाला मते मिळाली, पण नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असेही ते म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी आज कुटुंबातील सदस्यांसह भोकरदन येथे होळी साजरी केली. यावेळी त्यांनी आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. निवडणूक आल्यानंतर हे नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी संकेत दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif