Maharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

कोरोना व्हायरसची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस वेरिएंटचा धोका या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra ZP Election 2021 | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यातील 5 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) आणि डेल्टा प्लस वेरिएंटचा (Delta Plus Varient) धोका या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची आज प्रक्रिया होती. मात्र कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याने निवडणुका त्याच टप्प्यावर स्थगित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (9 जुलै) रोजी केली आहे.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुका 19 जुलै 2021 रोजी होणार होत्या. परंतु, 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणुक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत माहिती आणि  जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्या आधारे आयोगाने आजच्या टप्प्यावर निवडणूकांना स्थगिती दिली आहे. परिणामी पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहिता देखील आजपासून शिथील करण्यात आली आहे. (Maharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील पोटनिवडणुका पुढील सहा महिन्यासाठी स्थगित कराव्यात, सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका)

कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

सुप्रीमो कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या निर्णयानंतर पोटनिवडणुकींना स्थगिती देण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या विषयावर सुप्रीम कोर्टात 6 जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर आज अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.