Maharashtra SSC, HSC Supplementary Exam 2021: 10वी, 12वी पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरु; येथे पहा वेळापत्रक
या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर आणि दहावीची परीक्षा 22 सष्टेंबरपासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (SSC, HSC Supplementary Exam Time Table) जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर आणि दहावीची परीक्षा 22 सष्टेंबरपासून सुरु होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावी पुरवणी परीक्षा लेखी स्वरुपात होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in/ वर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसण्यासाठी 11 ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचा होता. तर लेट फी भरुन 19 ते 21 ऑगस्ट दरम्यानही अर्ज करता येणार होता.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा मंगळवार, 21 सप्टेंबर ते सोमवार, 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार, 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर मध्ये होणार आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
दरम्यान, संकेतस्थळावरील वेळापत्रक हे विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात देण्यात येणार वेळापत्रक अंतिम मानावे, अशी माहिती साईटवर देण्यात आली आहे. तसंच खाजगी यंत्रणेने छपाई केलेले आणि व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आले होते. मात्र या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने मिळालेल्या गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येणार आहे.