Maharashtra Sadan Case: महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांची भाजपवर टीका
यानंतर भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी (Maharashtra Sadan Case) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असा वाक्यप्रचार करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे. माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांना यापुढे दुसऱ्या वाक्यप्रचार शोधून काढवे लागणार, अशा शब्दात भुजबळ यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ म्हणाले की, “तुरुंगात रहायला कुणाला आवडेल? माझी दोन-तीन वेळा प्रकृती अतिशय बिघडली होती. मात्र, आता दुखःचा पाढा वाचण्यासाठी वेळ नाही. आता पुढे जायचे आहे. तुमचा भुजबळ करु असे म्हणणाऱ्यांना सांगायचे की त्यांचे सुद्धा भुजबळांसारखेच होईल. मला सुद्धा न्यायदेवतेने न्याय दिला आणि सोडले. तसे त्यांना सुद्धा त्रास होणार पण ते सुद्धा मुक्त होणार,”असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- 'महाराष्ट्र सरकार हिंदूविरोधी बनले आहे, सणासुदीच्या काळात मुद्दाम लादले निर्बंध'- मंत्री नारायण राणे यांनी साधला निशाणा
महाराष्ट्र सदन घोटाळा काय आहे?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लाच घेतली आहे, असा आरोप त्यांच्यावर होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून न्यायालयाने त्यांची दोषमुक्त सुटका करावी, असे त्यांनी अर्जात नमूद केले होते. त्यानंतर गुरुवारी भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.