कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, जिम, जलतरण केंद्र बंद; मॉल्स आणि थिएटर मात्र खुली राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मात्र मॉल्स आणि थिएटर खुली राहणार असल्याची माहिती,

Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना विषाणूचे (Corona Virus) 81 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस संक्रमण झालेल्यांची संख्या 17 वर पोहचली आहे व ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अशात केंद्र सरकार व राज्य सरकारकडून यावर उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात आज रात्रीपासून मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी शाळा, कॉलेज, जिम, जलतरण केंद्र, पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. मात्र मॉल्स आणि थिएटर खुली राहणार असल्याची माहिती, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व मॉल्स, थिएटर, जिम, जलतरण तलाव आजपासून 30 मार्चपर्यंत बंद राहतील असे सांगितले होते. मात्र आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच दिलेल्या माहितीनुसार यामधून मॉल्स आणि थिएटरना वगळण्यात आले आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांत तेही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य मंत्रालयाने या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी, देशभरात 52 चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगवेगळ्या प्रदेशात असलेल्या या चाचणी केंद्रांवर केला जाऊ शकतो. (हेही वाचा: कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यास मुंबई तयार; लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी 8 हॉस्पिटलमध्ये 233 बेड्सची व्यवस्था)

अशात मुंबईमधील 8 हॉस्पिटलमध्ये लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी 233 बेड्सची व्यवस्था केली गेली आहे. तसेच सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्येही लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी 300 बेड्स व लोकांना वेगळे ठेवण्यासाठी 30 बेड्स व्यवस्था केली जात आहे. नुकतेच ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून, कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने, मास्क (2-ply आणि 3-ply, सर्जिकल मास्क, एन 95 मास्क) आणि सॅनिटायझर्सना तात्पुरत्या आवश्यक वस्तू घोषित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या व्यक्तींनी 15 फेब्रुवारी नंतर चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या 7 देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी 5.30 नंतर देशात विमानाने येतील त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.