Maharashtra Gram Panchayat Elections 2021: ग्रामपंचात निवडणुकीसाठी 14 हजार 234 गावांमध्ये मतदानन संपन्न; सर्वांना 18 जानेवारीच्या मतमोजणीची उत्सुकता
आवश्यक प्रमाणात निवडणूक अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही तैनात होते
राज्यातील सुमारे 14 हजार 234 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, 15 जानेवारी 2021) मतदान (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडले. आता सर्वांना उत्सुकता आहे ती 18 जानेवारीची. येत्या 18 जानेवारीला ( Counting on January 18) या मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीचा अधिकार प्राप्त झालेल्या तरुण मतदारांपासून ते अगदी 102 वर्षांच्या अजिबाईंनीही मतदानाचा हक्क बजावला.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. आवश्यक प्रमाणात निवडणूक अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही तैनात होते. मतदान यंत्र बिघाड अथवा तांत्रिक अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections 2021: महाराष्ट्रातील 14 हजार 234 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान, 18 जानेवारीला निकाल)
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
दरम्यान, कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती, दोन वेळा तपासणी करुनही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा अधिक असलेल्या मतदारांना मतदानाचा कालावधी संपण्याच्या आधी आर्ध्या तासात मतदान करण्याची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली होती. या वेळी अटी आणि शर्थींचे पालन करण्याचे बंधन मतदारांवर होते.