‘महाराष्ट्र सरकार आमच्याशी खोटे बोलले’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर भाजपने साधला सरकारवर निशाणा; ‘शिवसेना गप्प आहे, हा राज्याचा अपमान नाही का?’
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत.
संपूर्ण जग कोरोना विषाणू (coronavirus) विरूद्ध लढाई लढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत. अशात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी नांदेड (Nanded) मधील यात्रेकरूंबाबत महाराष्ट्र सरकारवर आरोप केला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, नांदेडमध्ये अडकलेल्या भाविकांच्या कोरोना टेस्टबाबत महाराष्ट्र सरकार आमच्याशी खोटे बोलले. आता यावरूनच भाजपने (BJP) राज्य सरकारवर, मुख्यत्वे शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. गंभीर आरोप करून सुद्धा शिवसेना मूग गिळून गप्प का आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
भाजप महाराष्ट्र ट्विट -
नांदेडच्या गुरुद्वारामध्ये पंजाबचे हजारो भाविक अडकले होते, त्यांना परत पाठवण्यात आले आहे. मात्र आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी महाराष्ट्रावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आम्हाला सांगितले की आमच्या लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे, परंतु भाविकांची कसलीही चाचणी झालेली नाही. जर आम्हाला हे माहित असते तर, आम्ही त्यांची चाचणी घेतली असती. मात्र यावर अजूनतरी राज्य सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांतर आता महाराष्ट्र भाजपाने याबाबत एक ट्विट करत राज्य सरकारवर निष्ण साधला आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, ‘नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांना कोरोना झाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर खोटा बोलण्याचा गंभीर आरोप केला आहे. पंजाबमध्ये असलेले कॉंग्रेस सरकार सध्या राज्यात सत्तेत सहभागी आहे. तरी इतके गंभीर आरोप करून सुद्धा शिवसेना मूग गिळून गप्प आहे, हा आरोप राज्याचा अपमान नाही का?’. (हेही वाचा: शरद पवार यांचा मुंबईतील आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्यास विरोध: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलं पत्र)
दरम्यान, शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हजूर साहिब येथून पंजाबला परत आल्यानंतर राज्यातील 137 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काल अजून 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.