Maharashtra FDA has suspended licences of four Domino's pizza outlets (Photo Credits: X/Maharashtra Food & Drug Administration)

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील चार डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचे (Domino’s outlets in Mumbai) व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मुंबईतील तीन आणि सातारा जिल्ह्यातील एका आउटलेटचा समावेश आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने बुधवारी याबाबतची माहिती दिली आहे. नक्की वाचा: महाराष्ट्र एफडीएकडून आयआयटी मुंबईतील दोन कॅंटीन बंद, जाणून घ्या कारण काय 

Domino’s च्या कोणत्या आउटलेट्सवर कारवाई?

जुबिलंट फूडवर्क्स कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुंबईतील तीन डॉमिनोज आउटलेट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विले पार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील आर-सिटी मॉलमधील आउटलेटचा समावेश आहे. साखळी उपाहारगृहांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही तपासणी करण्यात आली. चौथे आउटलेट सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील माळकापूर येथे असून, ते देखील जुबिलंट फूडवर्क्सद्वारेच चालवले जाते.

काय आढळल्या त्रुटी

विले पार्ले येथील आउटलेटमध्ये एफएसएसएआय परवान्याचे प्रदर्शन, पिण्यायोग्य पाणी, अन्नसाठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधांसंदर्भात त्रुटी आढळल्या. एफडीएने या आउटलेटला गोठवलेल्या अन्नपदार्थांच्या तापमानाचे योग्य निरीक्षण, अन्न व बिगर-अन्न वस्तूंचे विलगीकरण, उंदीर व कीटक प्रतिबंध तसेच पुरेशी हात-धुण्याची व स्वच्छता व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील आउटलेटमध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत रचना, उपकरणे, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणात कमतरता आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. साठवणूक व्यवस्था सुधारण्याचे तसेच अन्नपदार्थांची प्रयोगशाळेत चाचणी करून त्याच्या नोंदी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

व्यापक कारवाई मोहीम

१० जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेत डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉंजिनीससह राज्यभरातील १०४ साखळी उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले, ९५ जणांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली, तर पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

कराड येथे केएफसी, पिझ्झा हट आणि टॅको बेल या फास्ट फूड साखळ्या चालवणाऱ्या सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडच्या एका आउटलेटचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मुंबईतील इतर कारवाई

मुंबईत डॉमिनोज व्यतिरिक्त मुलुंड येथील मुंबई मेट्रो ढाबा आणि भांडुप येथील गुलशन-दा-पंजाबी ढाबा यांचेही परवाने मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी, हवेशीरपणा, कीटक नियंत्रण आणि अन्नसाठवणुकीतील त्रुटींमुळे निलंबित करण्यात आले. एकूणच, गेल्या काही दिवसांत एफडीएने १२० आस्थापनांची तपासणी करून ५४ सुधारणा नोटिसा बजावल्या आणि ११ परवाने निलंबित केले.

मुंढे यांच्या कार्यकाळातील व्यापक मोहीम

मे महिन्यात तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील प्रसिद्ध हॉटेल्स आणि क्लबसह विविध खाद्य आस्थापनांविरोधात मोठी कारवाई मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत यापूर्वीच मलाड पश्चिम येथील ब्लिंकिट स्टोअरचाही परवाना निलंबित करण्यात आला होता, जिथे फळे व भाज्यांच्या साठ्यावर झुरळे, मुदतबाह्य उत्पादने आणि अपुरी साठवणूक व्यवस्था आढळली होती.

२५ मे ते ३१ जुलै या कालावधीत मुंबईतील ३,१३७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये आतापर्यंत १६५ परवाने निलंबित करण्यात आले असून ७६४ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.